ते दोघे वेगळे झाले पण नियतीचा मनात काही वेगळेच होते... - Mahendra Patil

Mahendra Patil

It's Only Collection that I Liked! Nothing My own! In this blog you get all types of Marathi Poems like Marathi Prem Kavita, Miss You Kavita, Ek Tarfi Prem Kavita, Marathi Sad Love Poems, Virah Kavita, Lonely Marathi Poems, Need You Marathi Poems n all.... Collection of more than 100 Marathi Poems Kavita. Thank You For Visiting!!!!!! *Mahendra Patil*

Patiljee

Post Top Ad

New Post

Thursday, November 2, 2017

ते दोघे वेगळे झाले पण नियतीचा मनात काही वेगळेच होते...

# चिन्मयीचे_प्रेम
“हं…..बोल…का फोन केलास....” “थँक्स चिन्मयी अजूनही माझा नंबर सेव्ह आहे तुझ्याकडे….बरं ऐक ना मला भेटायचंय तुला… मी येतोय भेटायला ….प्लिज आज काहीच बोलू नकोस चिन्मयी….कारण मला आज काहीही झालं तरी तुला भेटायचंच आहे हे नक्की आणि चिन्मयी प्लिज नक्की ये....आज ऑफिस झालं की गेटपाशी थांबतोय...चल मग भेटू संध्याकाळी ….बाय”स्वप्नील चा फोन ठेवल्यावर चिन्मयी ला आधी स्वतःचा राग आला होता की अजून आपण ह्याच्यावर प्रेम करतोय की काय... ह्याचा नंबर डिलीट का केलेला नाही आणि आत्ता फोनवर त्याला १००%नकार का देऊ शकलो नाही….पण आता काहीही इलाज नव्हता. पुन्हा फोन करण्यापेक्षा आज त्याला भेटणं जास्त बरं की हाफ डे घेऊन घरी यावं...कसं करावं..जाऊ दे आत्ता आधी घरचं आवरूया असा विचार करतच फोन आणि मनातले विचार बाजूला ठेवून चिन्मयीने राहिलेलं स्वैपाकाचं आवरायला सुरुवात केली….
....नंतर आईची अंघोळ आवरलेली बघून तिला कॉफी आणि खायला दिलं….तिच्या गोळ्या काढून ठेवल्या.बाबांनाही खायला देऊन तिनेही घड्याळ बघत चटकन डबा भरून खायला घेतलं. तिचं खाणं होत असतांनाच लक्ष्मी मावशी आली होती.तिलाही खायला देऊन चहा करत एकीकडे तिला घरातली कामं आणि त्या तिघांच्या जेवणाचं सांगून बाबांना चहा देऊन चिन्मयी आईजवळ आली… “आई बरं वाटतंय ना ग...बरं आई आज मला कदाचित थोडासा उशीर होईल ग... आता मावशी आली आहे मी आवरून निघतेच ..तू आराम कर उठू नकोस..बाबा आहेत”
आईशी बोलून झाल्यावर हॉल मध्ये पेपर वाचत असलेल्या बाबांजवळ चिन्मयी आली आणि हळूच त्यांच्याशेजारी नुसतीच बसली….तिच्या अशा शांत आणि त्यांना चिकटून बसण्याने बाबांना समजले की हिला आत्ता मनातलं काहीतरी बोलायचंय...पेपर बाजूला करत त्यांनी विचारले.. “काय चिनू आज ऑफिस ला दांडी की काय ग?बोल काय बोलायचंय तुला”….बाबांनी बरोबर ओळखले होते त्यामुळे किंचित हसत चिन्मयीने बोलायला सुरुवात केली… “बाबा मगाशी स्वप्नील चा फोन आला होता..मला काहीच बोलू न देता फक्त बोलायचंय ... भेटूया म्हणलाय…..जाऊ का नको..मलाच नेमकं समजत नाहीये बाबा” तिच्या पाठीवर मायेने हात फिरवत बाबा म्हणाले की.. “चिनू मला विचारशील तर मी म्हणेन जरूर भेट तू स्वप्नील ला...अगं मनात काहीही किंतु ठेवून भेटू नये..जा भेट त्याला काय म्हणतोय बघ...लगेच कुठल्याही निर्णयापर्यंत येऊ नये..एखादा निर्णय घेतांना मनाला देखील पुन्हा एकदा संधी द्यायला लागते कधीकधी…इथेतर तू स्वप्नीलवर प्रेम केलंयस…. नककी भेटून ये त्याला…. मी आहे घरी आईची काळजी करू नकोस ...संध्याकाळी मी मस्त तुझी आवडती कढी आणि आईला चालेल अशी खिचडी करतो...बरं घड्याळ बघ चिनू उशीर होईल तुला चल उठ आणि आवर लवकर”...
बाबांशी बोलल्याने मनाने थोडी रिलॅक्स झालेली चिन्मयी आवरून आईबाबांना सांगून ऑफिसला जायला निघाली….नेहमीच्या बसला नेहमीची जागा मिळाली होती तिला.बसच्या गती मुळे अर्थातच चिन्मयीच्या विचारांनाही गती मिळाली होती…बसमधे काय किंवा ऑफिसमधे काय चिन्मयी एकीकडे काम करत होती पण विचारचक्र सुरूच होते…स्वप्नीलच्या झालेल्या ओळखीपासून ती आठवणीतल्या स्वप्नील ला शोधत होती..दिवसभर जणू त्या आठवणी नजरेसमोर बघत होती.
स्वप्नील….कॉलेजमध्ये बघताक्षणी आवडलेला पहिलाच मुलगा होता.मग स्पर्धेच्या निमित्ताने किंवा कॉलेजच्या छोट्या ट्रिप मुळे तो जसा छान दिसतो तसाच गातोही मस्त हे समजले.मग हळूहळू त्याच्याशी बोलण्याची संधी शोधत चिन्मयी त्याला भेटत राहिली...मग गृप-गप्पा-भटकणे-गाणी-छोट्या ट्रिप्स-ट्रेक एकत्र होत गेले..चिन्मयी च्या बोलण्यातून आईबाबांना स्वप्नील समजत गेला..नुसता मित्र असलेला स्वप्नील मग खास मित्र झाला.
एव्हाना त्याला आणि चिन्मयीला कॉलेज संपल्यावर दोन-चार महिन्यात नोकरी देखील मिळालेली होती….दोघंही आपल्या नवीन नोकरीत थोडेसे बिझी होते..नेहमी होणारी स्वप्नील-चिन्मयीची भेट आता सुट्टीच्या दिवशी संध्याकाळी मात्र न चुकता होत होती...आईबाबा आता चिन्मयीला पुढे नक्की कधी लग्नाचं फिक्स करणार विचारायला लागले होते.पण चिन्मयी त्याबद्दल त्यांना काहीही सांगत नव्हती….कारण अजून तीचंच स्वप्नीलशी याबद्दल काही बोलणं झालेलं नव्हतं.
त्यादिवशी मात्र तिने भेटल्यावर स्वप्नीलला हे सगळं सांगितले आणि तिने त्याला विचारले…”स्वप्नील खरंच आता आपण पक्कं काय ते ठरवायला हवं ...तुझ्या आईबाबांना तू माझ्याबद्दल सांगितलंस का?मला घरी कधी नेणार आहेस...प्लिज स्वप्नील शांत बसू नकोस...बोल काहीतरी माझ्याशी”...चिन्मयी च्या प्रश्नावर शांत बसलेला स्वप्नील पाच मिनिटांनी बोलायला लागला…. “चिन्मयी मला अजून थोडा वेळ हवाय...माझं आत्ता नेमकं काय होतंय मलाच कळत नाहीये...आपण जरा थांबुया… मला थोडा विचार करू दे...म्हणजे माझं तुझ्यावर प्रेम आहे चिन्मयी...पण लग्नाबद्दल अजून काहीच विचार केला नाहीये असं म्हणायचंय मला.. आणि घरी काय सांगायचंय...आपण एकमेकांना आवडणं महत्त्वाचे आहे...जरी लग्न केलं तरी मला त्यांच्याबरोबर एकत्र राहायचं नाहीये….कारण माझं ठरलंय पैसे आहेत तर दुनिया आहे आणि चिन्मयी आपण दोघंही परदेशात जाऊ तिकडेच जास्त पगाराची नोकरी करून भरपूर पैसा मिळवू आणि तिकडेच सेटल होऊ...फक्त तू आणि मी इतकंच जग पुरेसं आहे मला….चिन्मयी” ...त्याच्या ह्या अगदीच अनपेक्षित आणि धक्कादायक उत्तराने नाकारलेल्या-बावरलेल्या-चिडलेल्या-खट्टू झालेल्या-डोळ्यात भीती दाटून आलेल्या चिन्मयी ला काय बोलावे तेच सुचेनासे झाले होते…..तरीही फक्त “ठीक आहे स्वप्नील बाय ...आणि हो प्लिज मला फोन करू नकोस मला एकटीला शांतपणे राहू दे...मला काहीही बोलायचे नाहीये”म्हणत चिन्मयी घरी गेली होती…
मनाच्या अशा विचित्र आणि अपमानित अवस्थेत घरी पोचलेल्या चिन्मयी ला शेजारच्या काकूंनी बघितले...तिला घरात बोलावून आधी पाणी दिले आणि आईला ऍटॅक आल्याने बाबांनी तिला दवाखान्यात नेल्याचे त्यांनी सांगितले…काकूंनी निरोप दिल्याबरोबर चिन्मयी तशीच तिथून निघून लगेचच दवाखान्यात पोचली होती…..मनातलं वादळ दूर सारून आईच्या अशा नाजूक अवस्थेत बाबांच्या जोडीला त्यांची लाडकी चिनू खंबीरपणे उभी राहिली होती.मग आईला घरी आणून तिला थोडंसं बरं वाटेपर्यंत चिन्मयी सुट्टी घेऊन घरीच थांबलेली होती…
.त्याच दरम्यान एके दिवशी “एकदाही फोन आणि बोलण्यात सुद्धा स्वप्नील चा उल्लेख कसा काय नाही ग चिनू?कुठे परगावी गेलाय का स्वप्नील?”असे बाबांनी विचारले आणि त्यादिवशी घडलेलं सगळं आणि तिच्या मनातलं सगळं वादळ बोलून चिनू मोकळी झाली होती...अगदी स्वप्नीलचा आलेला राग आणि तिला विश्वासात न घेता परस्पर घेतलेले निर्णय-आईबाबांना सोडून तिकडे सेटल होणे हे देखील तिने बाबांना सांगितलं होतं.बाबांनी तेव्हा फक्त चिन्मयी सांगत होती ते सगळं ऐकून घेतलेलं होतं त्यांनाही स्वप्नील असं कसं वागला हे मनात आले होते...मात्र त्यावर ते काहीही बोलले नव्हते... त्यांनी फक्त तिला शांत केलं होतं.पुढे हळूहळू आईच्या तब्येतीत बरीच सुधारणा झालेली होती आणि मदतीला येणारी लक्ष्मी मावशी फार चांगली होती…त्यामुळे चिन्मयी पुन्हा ऑफिस ला जायला लागलेली होती…
सगळं व्यवस्थित सुरू असतानाच अचानक आज एक दिड महिन्यांनी स्वप्नील चा फोन आल्याने चिन्मयी जराशी गोंधळून गेलेली होती...शेवटी स्वप्नील ला भेटण्याची वेळ आलीच….स्वतः शांत राहात चिन्मयीने टेबल आवरलं..थोडी फ्रेश होऊन ती ऑफिस बाहेर पडली तर स्वप्नील तिची वाटच बघत होता...मग त्याच्याबरोबर एका निवांतपणे बोलता येईल अशा हॉटेलमध्ये चिन्मयी आली..आल्या आल्या त्याने तिच्या आवडीची कडक कॉफी आणि तिचे आवडते सँडविच मागवले होते...ऑफिसमधून बाहेर पडल्यापासून चिन्मयी अगदी जुजबी हो नाही असंच बोलत होती.आता हा काय बोलेल आपल्याशी अशा विचारात समोर आलेली कॉफी चिन्मयीने घेतली आणि तिला जरा बरे वाटले.आता काय ते स्वप्नील बोलेल आपण काहीही प्रतिक्रिया द्यायची नाही हे ठरवूनच ती आलेली असल्याने पाच एक मिनिटं शांततेत गेली.
कॉफीचा मग खाली ठेवून स्वप्नील ने बोलायला सुरुवात केली….. “चिन्मयी जमलं तर मला माफ कर...तुला कदाचित मी बोलतोय हे नाटकी वाटेल पण तुला दुखावलं आहे मी...तुला काय वाटतंय..तुझी काय इच्छा आहे हे विचारात न घेता गृहीत धरलं ग मी तुला..माझी खोटी स्वप्नं लादली तुझ्यावर.....पण मग तू माझ्याशी बोलेनाशी झाल्यावर मी काय चूक केलीय आणि किती चुकलोय ते लक्षात आलं माझ्या...आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मी ज्यांच्यापासून लांब जाणार होतो त्यांना माझी आज किती गरज आहे हे उमजलं मला…
त्यादिवशी रोजच्या सारखेच सकाळी फिरायला गेलेले असतांना माझ्या बाबांना अचानक चक्कर आली आणि ते रस्त्यात पडले तेव्हा तिथल्या लोकांनी मला त्यांच्या फोनवरून कळवले आणि त्यांना जवळच्या दवाखान्यात नेले….मी लगेचच तिथे पोचलो आणि वेळीच उपचार मिळाल्याने बाबा वाचले….त्यांच्या ह्या अवस्थेत मी इथे होतो म्हणून आईला आधार होता….मी त्यांना सोडून परदेशात कायमचा निघून गेलो असतो तर….ह्या विचारानेच मला खूप त्रास झाला चिन्मयी...त्यांच्या ह्या दुखण्याने मी भानावर आलो..जे समजत नव्हतं ते समजलं... फक्त पैसे मिळवत बसलो तर ही आईबाबांची माया कुठून आणू मी?हे लक्षात आलं...
माझं खूप चुकलं चिन्मयी...ह्या मधल्या काळात तुला सुद्धा फोन करण्यासाठी किती वेळा फोन हातात घेऊन ठेवून दिला होता मी.अलीकडेच तुझ्या घरी सुद्धा आलो होतो..तेव्हा मला काकूंच्या आजारपणाचे समजले...तू ऑफिसला गेलेली होतीस आणि तू कदाचित चिडली असतीस म्हणूनच मी त्यांना मी येऊन गेल्याचं तुला काही सांगू नका असे म्हणलो होतो..काका-काकूंशी जरा वेळ बोलत बसलो….माझी चूक कबूल केली….त्यांची सुद्धा माफी मागितली कारण काकु दवाखान्यात असतांना मी साधा तुझा मित्र म्हणून सुद्धा मदतीला पुढे झालो नव्हतो…मला माफ कर चिन्मयी...
...हे सगळं नेमकं काय बोलतोय स्वप्नील ह्याचा विचार करत असतांना तिच्या लक्षात आले की सकाळी बाबा आपल्याला मनाला संधी द्यायला हवी का म्हणत होते..अनपेक्षित उत्तराच्या वेळी बेफिकिरी जाणवलेल्या स्वप्नीलच्या डोळ्यात तिला आज मात्र त्याचा खरेपणा आणि तिच्यासाठी असलेलं प्रेम जाणवत होतं…इतके दिवस मनात असलेला राग-अबोला भरून आलेल्या डोळ्यातून वाहून जात होता...स्वच्छ झालेल्या नजरेतून प्रेमाने बघत चिन्मयीने फक्त स्वप्नीलचा हात हातात घेतला होता….आता स्वप्नीलनेही तिचा हात घट्ट धरून ठेवलेला होता कधीही न सोडण्यासाठी….

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here