सत्याला मरण नाही... - Mahendra Patil

Mahendra Patil

It's Only Collection that I Liked! Nothing My own! In this blog you get all types of Marathi Poems like Marathi Prem Kavita, Miss You Kavita, Ek Tarfi Prem Kavita, Marathi Sad Love Poems, Virah Kavita, Lonely Marathi Poems, Need You Marathi Poems n all.... Collection of more than 100 Marathi Poems Kavita. Thank You For Visiting!!!!!! *Mahendra Patil*

Patiljee

Post Top Ad

New Post

Wednesday, October 25, 2017

सत्याला मरण नाही...

सत्याला मरण नाही, सत्य हे शवटी उजेडात येते ही वाक्य किती सहजतेने आपण उच्चारतो. आणि कोणत्याही गोष्टीत सहजता आली की त्यातील गांभिर्य निघून जाते. सत्याचं तसंच झालंय असं मला वाटतं. सत्य हे सत्य असतं आणि सत्य बोलणं नेहेमीच चांगलं असतं असं म्हणून आपण सर्वच दररोज धडधडीत असत्याची काय धरत असतो, ते त्यातील गांभिर्य गेल्यामुळेच. गांधीजींची तसबिर सर्वांना दिसेल अशी भिंतीवर लावून कोर्टात तर सत्याचा चक्क बाजार मांडलेला दिसतो तो त्यामुळेच..

पण मी जेंव्हा 'सत्याला मरण नसतं' किंवा 'सत्य नेहेमी शेवटी उजेडात येतं' यासारख्या वाक्यांचा - खरं तर सुभाषितांचा आणि सुभाषितं कुठं सिरियसली घ्यायची असतात?- विचार करतो तेंव्हा त्यातील खोल अर्थ हळुहळू माझ्या लक्षात यायला लागतो. मला समजलेला अर्थच तुमच्याशी शेअर करावा असं वाटतं.

पुराणांमधे सप्त चिरंजीवांचा उल्लेख आहे. 'चिरंजीव' या शब्दाचा अर्थ मागे कुठं तरी वाचला होता, कुठं तो आता आठवत नाही, परंतू तो मला मनापासून पटला होता. त्यात त्या लेखकानं म्हटलं होतं की' 'पुराणांमधे सप्त चिरंजीव होऊन गेले, ते चिरंजीव का, तर त्यांच्या मरणाचा उल्लेख पुराणांमधे कुठेही आलेला नाही'  म्हणजे त्या सप्त चिरंजीवांचा मृत्यु झाला की नाही अथवा झाला असल्यास कसा झाला याचा कोणताही उल्लेख पुराणांमधे नाही.

सत्याचं असंच असावं का? तर नसावं. सत्याचा मृत्यू, नव्हे, धडधडीत खून होताना आपण रोज अनुभवतो तरी सत्याचा जयघोष पुन्हा नव्याने सुरूच असतानाही दिसतो. आपणही कधी कधी सत्याचा खून करण्यात आणि पुन्हा नव्याने त्याच्या जयघोषात सामिल असतो. पुन्हा पुन्हा खून होऊनही पुन्हा पुन्हा बळी जाण्यासाठी सत्य पुन्हा पुन्हा नव्याने जिवंत होतं असतं म्हणून सत्याला मरण नाही असं तर म्हणत नसावेत ना? पुराणांततील सप्त चिरंजीवांच्या मरणाचा उल्लेख नाही म्हणून ते चिरंजीव, तर सत्य मरुनही पुन्हा जिवंत होतं, म्हणून ते ही चिरंजीव..! किंवा  पुराणकथांत काही असलं, तरी पृथ्वीवर जे जे जन्माला येतं, त्या त्या त्याला मरण हे असतंच. मग असं असेल तर सत्य अजून जन्मलंच नसेल तर त्याला मरण येणार तरी कसं, असंही असू शकेल..!

तसंच 'सत्य शेवटी उजेडात येतं' या सुभाषिताचं असावं. हे वाक्य वरवर साधं वाटलं, तरी ते तसं नाही असं माझं मत आहे. या वाक्याचा अर्थ नीट समजून घ्यायचा तर विज्ञानातील घटनांची उदाहरणं द्यावी लागतील तरच ते नीट समजेल. आणि मग ते वाक्य व्यवहारातील इतर बाबींना लागू पडतं किंवा नाही हे तपासावं लागेल.

पूर्वी पृथ्वी सपाट आहे अशीच समजूत होती. ती गोल आहे असं सांगणाऱ्यांना जबरीची आत्महत्या करावी लागली होती हे आपल्याला माहित आहे. पृथ्वी गोल आहे हे नव सत्य सिद्ध होईपर्यंत पृथ्वी सपाट आहे हे 'समजलं' गेलेलं सत्यच होतं. आकाशात नऊ ग्रह आहेत हे काही वर्षांपूर्वी सत्य होतं व आता ते ग्रह १२ आहेत हे ही सत्यच आहे. असे आणखी किती ग्रह आहेत हे नवं सत्य भविष्यात उजेडात येईपर्यंत ग्रह १२च आहेत हे सत्य राज्य करणार व नेमके किती ग्रह आहेत ह्याचं नवनविन सत्य उजेडात येतंच राहाणार. फाशीची किंवा जन्मठेपेची सजा झालेल्या केद्याच्या बाजूने पुढे कधीतरी एखादा नविन पुरावा पुढे येतो व तो कैदी चक्क निर्दोष सुटतो. तो गुन्हेगार आहे व तो गुन्हेगार नाही ही दोन्ही सत्य त्या त्या काळाच्या आणि परिस्थितीशी सापेक्ष सत्य आहेत. अशी उदाहरणं रोजच्या जगण्यातही सापडतात. पूर्वी मुंबईहून इंग्लंडला बोटीने जायला तिन महिने लागत हे ही सत्य आहे आणि आता ७-८ तास लागतात हे ही सत्य आहे. पुढे कधीतरी हा प्रवास तासा-दोन तासात करणं शक्य झालं तर तेही सत्यच असणार. म्हणून सत्य शेवटी उजेडात येतं म्हणत असावेत आणि तो शेवट कधी हे कुणालाच सांगता येत नाही.

नविन सत्य उजेडात येईपर्यंत त्या त्या काळी प्रचलित असलेलं सत्य बे सत्यच असतं आणि त्या सत्याला अगदी उभा-आडवा छेद देणारं नवनविन सत्य उजेडात येतंच असतं. ही प्रक्रिया जगाच्या सुरूवातीपासून चालू आहे आणि ती अतापर्यत चालुच राहाणार आहे. तो शेवट कधी, हे कुणालाही सांगता येणं अवघड असतं आणि म्हणून 'सत्य शेवटी उजेडात येतं' असं म्हणत असतील..!

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here